१ जुलै पासून सकाळी धावणार मिरज-कलबुर्गी-मिरज स्पेशल

मिरज / प्रतिनिधी

सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर – कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी येथील प्रवासी संघटना, सल्लागार समिती सदस्य व नागरिकांनी केली होती. मुंबई येथे झालेल्या मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी झाली होती. सदर गाडी कोल्हापूरहून शक्य नसेल तर मिरज मधून सुरू करण्यात यावी किंवा ते सुद्धा शक्य नसेल तर मिरज कुडूवाडी डेमु एक्सप्रेसचा कलबुर्गी पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीच्या अनुषंगाने मध्य रेल्वेकडून येणाऱ्या पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त सकाळच्या सत्रामध्ये १ जुलै २०२५ ते १० जुलै २०२५ च्या दरम्यान गाडी क्र. ०११०७/०८ मिरज – कलबुर्गी – मिरज स्पेशल १४ डब्याची गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी मिरज येथून पहाटे ५ वाजता निघेल व कलबुर्गी येथे दुपारी १:३०वा. पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी येथून दुपारी ३:३० वा. सुटेल व मिरज येथे रात्री ११:५० वा. पोहोचेल. या गाडीस आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जतरोड, म्हसोबाडोंगर, जवळा, वासुद, सांगोला, पंढरपुर, मोडलिंब, कुर्दुवाडी, माढा, मोहोळ, सोलापुर, अक्कलकोट, दुधनी, गाणगापुर या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.
हि गाडी सुरु झाल्यानंतर पंढरपुरच्या पांडुरंगाबरोबर सोलापूरचे सिद्धेश्वर, तुळजाभवानी शिवाय अक्कलकोटचे स्वामी समर्थ तसेच गाणगापूरचे श्री दत्त यांचे दर्शन घेण्याची सुविधा होणार आहे.

Scroll to Top