कोणतेही शुभ काम करायचे असेल तर आपण प्रथम मुहूर्त पाहतो. हिंदू धर्मामध्ये मुहूर्त पाहणे आणि कोणतेही काम त्या शुभ मुहूर्तांवर करण्यास खूप महत्त्व दिले जाते. अगदी घर, गाडी, सोने यांसारख्या महागड्या वस्तूंची खरेदी करणे असेल किंवा साखरपुडा, लग्न, पूजा यांसारखी मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अशी शुभ कार्य असली की सगळ्यात मुहूर्त पाहिले जातात. त्या मुहूर्तांमध्ये जो सर्वात शुभ असतो, त्याची आपण निवड करतो. मात्र, काही दिवस असे असतात, ज्यासाठी मुहूर्त पाहण्याची अजिबात गरज नसते. त्या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकतात असे दिवस हे साडेतीन मुहूर्तांमध्ये मोडतात.
यामध्ये गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा, दिवाळी पाडवा / बलिप्रतिपदा हे सर्व दिवस साडेतीन मुहूर्तांमध्ये गणले जातात. खरंतर आपण कायम यांना साडेतीन मुहूर्त असे म्हणत असलो तरीही ते एकूण चार आहेत.
गुढीपाडवा
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभी दिवस… गुढीपाडवा हा सण साडे तीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. यादिवशी लोक नवीन वस्तूंची खरेदी करतात. आपल्या नवीन व्यवसायाचा प्रारंभ करतात. या दिवशी गुढी उभारली जाते. तर साडे तीन मुहुर्तांपैंकी एक असल्यामुळे गुढीपाडवा या सणाला खूपच विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.
अक्षय तृतीया
अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहुर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त असल्याचे मानले जाते. या दिवशी सुरु केलेले कार्य, किंवा खरेदी केलेल्याची कधी क्षय होत नसल्याचे म्हटले जाते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीच क्षय किंवा नाश होत नाही असा दिवस. या दिवशी सुरु केलेल्या कार्याला प्रचंड यश मिळते, अशी लोकांची धारणा आहे. अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीया या तिथी येतो. या तिथीला क्षय नाही म्हणून यादिवशी दान- धर्म, खरेदी, नवीन कार्य आरंभ तसेच जप- तप इतर गोष्टी करण्यास प्राधान्य दिलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सोने खरेदी करण्यास अधिक प्राधान्य देतात.
विजयादशमी
दसरा हा सण देखील साडेतीन मुहूर्तापैंकी एक असल्याचे म्हटले जाते. अश्विन महिन्यातील दशमीच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. विजयादशमी हा पराक्रमाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन तसेच शस्त्रपूजन ही केले जाते.
हा दिवस विजयाचा दिवस असल्याचे मानले जाते. म्हणून या दिवशी कोणतेही कार्य मुहूर्त न बघता करता येतात. सोने-चांदी, दागिने, घर, वाहन यांची खरेदी करतात. तसेच आपल्या महत्वाच्या कामाची सुरुवात देखील या शुभ मुहूर्तावर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण हे साडेतीन मुहूर्त पूर्णपणे शुद्ध असल्याची लोकांची धारणा असते.
बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा दिवस देखील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून मानला जातो. या बलिप्रतिपदा देखील म्हणतात. हा दिवस नवीन कार्याच्या शुभारंभासाठी महत्त्वाचा मानला जातो. सर्व व्यापारी वर्गाचे लोक या दिवशी वही खात्याचे पूजन करतात. यादिवशी सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते.