कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड शहरातील बहुप्रतीक्षित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी चौथ्या दिवशीही घंटानाद आंदोलनाने प्रशासनाला हादरवले. शासनाने प्रशासकीय मान्यता देण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्ष निधी जमा न झाल्याने सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.
सुमारे ४९ कोटींचा खर्च असलेल्या या योजनेत दिरंगाई होत असल्याने पालिका कार्यालयासमोर जोरदार घंटानाद करत नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संतप्त शब्दांत टीका केली. या आंदोलनात माजी नगरसेवक राजू आवळे, प्रफुल पाटील, अजित देसाई, राजेंद्र बेले आदींसह सर्व पक्षांचे पाठबळ आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. घोषणांनी परिसर दणाणून सोडताना आंदोलकांनी शासनाला इशारा दिला की, प्रत्यक्ष निधी खात्यात जमा झाल्याशिवाय आंदोलन शिथील केले जाणार नाही. पाण्याचा प्रश्न हा मानवी हक्काचा असून त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे. यावेळी आंदोलनात अनिकेत बेले, शब्बीर बागवान, आप्पासाहेब गावडे, असिफ घोरी, आदी नागरिक सहभागी झाले आहेत.

