कोल्हापूर / प्रतिनिधी
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन तर्फे लोणावळा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा २० वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने विजेतेपद पटकाविले.
कोल्हापूरच्या संघाने बलाढ्य नागपूर व मुंबई संघांबरोबरच नांदेड, रायगड या संघांना पराभूत करून यश मिळविले. या संघाला प्रोत्साहन आणि पाठबळ म्हणून कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे (केएसए) अध्यक्ष मालोजीराजे यांनी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तर विफाच्या महिला अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना कास्को फुटबॉल आणि स्टड शूज भेट देऊन गौरविण्यात आले.
यावेळी केएसएचे सचिव माणिक मंडलिक, प्रा. अमर सासणे, नंदकुमार वामणे, फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी, नितीन जाधव, दीपक घोडके, प्रदीप साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघाचे प्रशिक्षक रवींद्र शेळके, विश्वंभर मालेकर, रिची फर्नांडिस व निखिल कदम यांनाही गौरविण्यात आले.
विजेत्या संघात गोलकीपर सोहम खामकर, विवेकसिंह पाटील, रेहान मुजावर, सिद्धेश भाट, प्रतीक गायकवाड, पार्थ मोहिते, साईराज पाटील, संचित तेलंग, यशराज खोत, सोहम निकम, प्रेम देसाई (कर्णधार), सोहम साळोखे, सिद्धार्थ पाटोळे, देवराज जाधव, सिद्धेश पंदारे, सत्येन पाटील, सर्वेश वाडकर व जैद शेख यांचा समावेश आहे.

