मुंबईतील ६६ वीर जवानांना वाहिली श्रद्धांजली

इचलकरंजी / प्रतिनिधी

अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त अत्यावश्यक अग्निशमन व आणीबाणी सेवा दल, वाहन विभागाच्या वतीने शनिवारी रॅली काढण्यात आली. मुंबई येथील भिषण आगीवेळी ६६ जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वाहन विभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. गावभाग फायर स्टेशन केंद्र क्रं. १, स्टेशन रोड फायर स्टेशन केंद्र क्रं. २ कडील सर्व कर्मचारी वाहनांसह ड्रेस कोडवर उपस्थित होते. वाहन अधीक्षक तथा अग्निशमन अधिकारी प्रशांत आरगे यांच्या अध्यक्षतेखाली १४ ते २० एप्रिलदरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह रॅली कार्यक्रम पार पडला.
इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त अग्निशमन विभागाने जनजागृती करावे, असे आवाहन केले होते. त्यानिमित्त या सप्ताहात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील गोदी बंदरात एस. एस. स्टिकिंग फोर्ट या जहाजाचा स्फोट होऊन भीषण आग लागून आगीने रौद्ररूप धारण केले होते. यामध्ये अग्निशमन दलातील अनेक जवानांना आपले कर्तव्य निभावत असताना आगीशी झुंज देत असताना त्यांना वीर मरण आले. त्या ६६ अग्निशमन जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या शहीद हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांना इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक अग्निशमन व आणीबाणी सेवा दल फायर स्टेशन, वाहन विभागाच्या वतीने संचलन करत जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. शनिवारी सकाळी ९ वाजता शाहू पुतळा येथून रॅलीला सुरुवात झाली. शाहू पुतळा, शिवाजी पुतळा, जनता चौक, गांधी पुतळा ते वाहन विभाग गैरेज या मार्गावरून अग्निशमन व आणीबाणी सेवा दल, वाहन विभागाच्या वतीने रॅली काढण्यात आली.

Scroll to Top