कोल्हापूर / प्रतिनिधी
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या वीज कंपन्यातील बदली धोरणासह अन्य मागण्यांसाठी सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन (एसईए) ही अभियंत्यांची संघटना आक्रमक झाली आहे. मंगळवारी महावितरणच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर झालेल्या गेट मिटिंगमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभियंत्यांनी दिला आहे. २५ एप्रिलपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या वीज कंपन्यांमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत धोरण बदलण्यात येत आहे. तसेच महावितरणचे रिस्ट्रक्चरिंग, स्टाफ सेटअप अशा विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाने अभियंत्यांवर अन्याय केला आहे. याच्याविरोधात अभियंता संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मंगळवारी राज्यातील सर्व कार्यालयासमोर गेट मिटिंग घेण्यात आली. यावेळी चुकीच्या परिपत्रकांची होळी करण्यात आली. १७ एप्रिल रोजी ऑनलाईन व्हीसी आणि प्रशासकीय बैठकांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. २१ एप्रिलपासून अतिरिक्त पदभार सोडण्यात येणार असून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. २३ एप्रिल रोजी मोबाईल नंबर डायव्हर्ट करून सीम कार्ड कंपनीस परत करण्यात येणार आहेत. २५ एप्रिलपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी संघटनेचे सहसचिव रत्नाकर मोहिते, नरेंद्र पाटील, विनायक पाटील, नागेश बसरी कट्टी, संदीप कांबळे, सचिन सदामते यांच्यासह अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

