कराड/प्रतिनिधी
महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भक्त भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बनपूरी येथील श्री नाईकबा देवाची यात्रा गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. अनेक सासन काठ्यांनी पारंपारिक वाद्यावर ताल धरलेला दिसला.
यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी हजारोंच्या संख्येने भक्त नाईकबाच्या डोंगर माथ्यावर दाखल झाले होते. गुरुवार हा देवाचा नैवैद्याचा दिवस व शुक्रवारी पहाटे पालखी सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र व कर्नाटकातून लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र बनपूरी नाईकबा देवाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नाईकबा पठारावर ४० ते ५० सासन काठ्या येतात. शुक्रवारी पहाटे देवाचा पालखी सोहळा आणि नाईकबाच्या नावाचा गजर सुरु झाला. पालखी व सासन काठ्यांवर गुलाल खोबऱ्यांची उधळण करण्यात आली. नाईकबा डोंगर जणु गुलालांनी उधळून गेला होता. यात्रा काळात नाईकबा भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसौय होऊ नये म्हणून तालुका प्रशासन, ग्रामपंचायत बनपूरी, श्री नाईकबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महावितरण विभाग अशा सर्व विभागांनी चोख व्यवस्था ठेवली होती. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. प्रवीण धाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

