शिरोळ/ प्रतिनिधी
‘अमर रहे अमर रहे, सूरज पाटील अमर रहे’, अशा घोषणा देत आणि आजी-माजी सैनिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, एनसीसी विद्यार्थी यासह जनसागराच्या साक्षीने शिरोळचे सुपुत्र जवान सूरज पाटील यांच्यावर सोमवारी येथील वैकुंठधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे सूरज यांना शनिवारी वीरमरण आले. त्यांचे पार्थिव रविवारी दिल्लीत व सायंकाळी पुण्यात आले. तिथे बॉम्बे इंजिनियर बटालियनने मानवंदना दिल्यानंतर पार्थिव निवासस्थानी आणले. वडील भारत पाटील, आई सुरेखा, भाऊ संदीप, बहीण प्रणाली, ज्योती, प्रियांका, आजी श्रीमती भागीरथी व कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता. त्यानंतर फुलाने सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत पार्थिव ठेवून प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली.
वैकुंठधाम येथे कर्नल अमरसिंह सावंत, सुभेदार माळी, नायब सुभेदार विजय चव्हाण, हवालदार विशाल सूर्यवंशी, खा. धैर्यशील माने, आ. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. डॉअशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, ‘दत्त’चे संचालक अनिलराव यादव, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, युवानेते पृथ्वीराजसिंह यादव, आजी-माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय माने, शिरोळ तालुकाध्यक्ष दिनकर घाटगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. सैन्य दलाच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर वडील भारत पाटील आणि भाऊ संदीप यांनी पार्थिवास भडाग्नी दिला.

