रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

इचलकरंजी/प्रतिनिधी


इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी सोमवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामुहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते. यावेळी जागतिक शांततेसह देशातील एकता व अखंडता तसेच जातीय सलोखा कायम राहून सर्व संकटे दूर होण्यासाठी दुवापठण करण्यात आले. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी मौसमी चौगुले, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे , सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम समाजात रमजान ईद सर्वात मोठा सण मानला जातो. यादिवशी ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण केले जाते. मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता यंदा नमाज पठणाची वेळ लवकर करण्यात आली होती. रुई मदरसाचे मौलाना महंमदली पटेल यांनी बयान पठण तर नमाज पठण आलमगीर मस्जिदचे हाफिज इम्रानशहा मकानदार यांनी केले. हजरत सय्यद मखतूमवली दर्गा ट्रस्ट व इदगाह ट्रस्ट यांचे वतीने नियोजन करण्यात आले होते. बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती.

Scroll to Top