महानगरपालिकेच्या लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर इयत्ता पहिलीचे प्रवेश गुढीपाडव्याच्या दिवशी हाऊसफुल्ल झाले. ४०७विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. पहिली ते सातवी २,४३४ पट संख्येचा आकडा जरगनगर विद्यालयाने पार केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा असलेल्या व स्कॉलरशिपमध्ये महाराष्ट्रभर जरगनगर पॅटर्न म्हणून नावलौकिक मिळवलेल्या शाळेचे पहिलीचे प्रवेश गुढीपाडव्याच्या दिवशीच हाऊसफुल्ल होतात.
शाळेत रविवारी गुढीपाडव्या दिवशी प्रवेशासाठी तब्बल २२ तास आधिपासून पालकांनी रांगा लावल्या होत्या. शनिवारी रात्री ९ वाजता शाळेचे प्रवेश संपल्याने मुख्याध्यापिका व शिक्षकांनी उपस्थित पालकांना टोकन देऊन घरी जाण्याचे आवाहन केले. रविवारी सकाळी ८ वाजता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. इयत्ता पहिलीसाठी ४०७पालकांनी प्रवेश अर्ज स्वीकारले. दुसरी ते सातवीसाठी १३५ नवीन विद्यार्थ्यांनी नावे नोंद केली. गुढीपाडव्यादिवशी लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरमध्ये पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी केलेली गर्दी. प्रवेश मर्यादा संपल्याने बऱ्याच पालकांना प्रवेश देता आला नाही.
प्रवेश प्रक्रियेला प्राथमिक शिक्षण समिती प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई, चंद्रकांत कुंभार आदींचे मार्गदर्शन लाभले. केंद्र मुख्याध्यापक नीता ठोंबरे यांनी प्रस्ताविक केले.
शाळेच्या माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. सरिता सुतार यांच्या संकल्पनेतून शाळेचे शीर्षक गीत तयार करण्यात आले आहे. त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ शिक्षक शिवाजी मेथे पाटील, विमल गवळी, बाळासाहेब काळे यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले. युवराज सरनाईक यांनी आभार मानले.

