विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण रखडणार आहे. जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, विस्तारीकरण क्षेत्रात असलेल्या कोल्हापूर-हुपरी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्याखेरीज संपादित क्षेत्र ताब्यात घेण्यास विमानतळ प्राधिकरणाने नकार दिला आहे. यामुळे धावपट्टी विस्तारित होऊन त्यावर मोठी विमाने उतरण्याचे आणि कोल्हापूरची हवाई वाहतूक विस्तारण्याचे कोल्हापूरकरांचे स्वप्न 2026 नंतरच सत्यात उतरेल, अशी चिन्हे आहेत.
कोल्हापूर विमानतळावरील 1370 मीटर धावपट्टी वाढवून 2300 मीटरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. याकरिता नव्याने 67 एकर जमिनीची संपादन प्रक्रिया राबविली. तीन वर्षे प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनाने या जागेचे संपादन पूर्ण केले. यापूर्वी ताब्यात दिलेल्या आणि आता उर्वरित अशी 67 एकर जागा 20 जानेवारी 2025 रोजी प्राधिकरणाच्या ताब्यात देण्याचे प्रशासनाने नियोजित होते. मात्र, विस्तारित क्षेत्रातून जाणार्या कोल्हापूर-हुपरी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याखेरीज जागा ताब्यात घेण्यास प्राधिकरणाने नकार दिला.
भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि राज्य शासन यांच्या संयुक्त बैठकीत प्रश्न सुटेल आणि एक-दोन महिन्यांतच विस्तारीकरणाला सुरवात होईल. राज्य शासन पर्यायी रस्त्याबाबत कालबद्धता निश्चित करून तशी हमी प्राधिकरणाला देईल. प्राधिकरण विस्तारीकरणाचे काम सुरू करेल, याकरिता पालकमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील दोन मंत्री, आमदारांनी राज्य शासनाकडे तर तीन खासदारांनी भारतीय प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून, पुढाकार घेऊन ही तातडीची बैठक घ्यावी. अन्यथा विस्तारित धावपट्टी, मोठी विमाने, मोठ्या शहरात हवाई सेवा ही सर्व स्वप्ने आणखी दोन-तीन वर्षे कायमच राहणार हे निश्चित.
विमानतळ प्राधिकरणाने त्यांच्याच जागेतून पर्यायी मार्ग द्यावा, अन्यथा नव्याने 36 हजार चौरस मीटर जागा संपादित करावी लागेल. जागेसाठी 65 कोटी तर रस्त्यासाठी 15 कोटी निधी आवश्यक आहे. निधी मंजूर होऊन सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी लागणार आहे. यामुळे जागा ताब्यात घेऊन धावपट्टी विस्तारीकरणाचे काम तत्काळ सुरू करा. हे काम पूर्ण होईपर्यंत रस्त्याचेही काम होईल.
विस्तारीकरणाच्या क्षेत्रात अखेरच्या टप्प्यातून हा रस्ता जातो. 2300 मीटरची धावपट्टी संपल्यानंतर हा रस्ता येतो. पुढेही काही क्षेत्र शिल्लक राहते. मात्र, या रस्त्यावरून वाहतूक सुरू राहणार असल्याने लँडिंग, टेकऑफला सुरक्षितता यादृष्टीने अडचणी येऊ शकतात. यामुळे रस्ता विस्तारित क्षेत्राच्या बाहेरून घ्यावा, अशी प्राधिकरणाची भूमिका आहे. यामुळे या रस्त्याचा प्रश्न निकाली लागल्याखेरीज जागा ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
विमानतळ हद्दीतून नेर्ली-तामगाव रस्ता सुरू आहे. तो बंद करण्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू आहे. तो लवकरच बंद होईल. पण यामुळे विमान वाहतुकीवर काहीही परिणाम झालेला नाही. मग कोल्हापूर-हुपरी रस्त्याबाबत आडमुठी भूमिका का?
धावपट्टी विस्तारीकरण काम पूर्ण होण्यास वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. एक छोटी दरीच 28 लाख ब्रास दगड-मुरूम यांनी भरून घ्यावी लागणार आहे. या कालावधीत कोल्हापूर-हुपरी रस्त्याचा प्रश्न सुटणारच आहे. मग धावपट्टी विस्तारीकरण सुरू करण्यास हरकत काय?
विस्तारीकरणासाठीच्या खर्चापेक्षा दीड-दोन वर्षांनी याच कामाचा खर्च किमान दीडपट होण्याची शक्यता आहे. त्यावेळच्या डीएसआरप्रमाणे तो खर्च वाढणार असल्यामुळे विमानतळ प्राधिकरणाला तोटाच आहे. मग हा वाढीव खर्च का?
धावपट्टीचे सध्या 1900 मीटरपर्यंत विस्तारीकरण झाले आहे. त्यापैकी 1750 मीटरचा वापर सुरू आहे. मोठी धावपट्टी नसल्याने एअरबससारखी विमाने उतरत नाहीत. कंपन्यांकडे एटीआर 72 सारखी छोटी विमानेही नाहीत. कोल्हापूरची हवाई सेवा विस्तारण्यावर मर्यादा का आणता?

