निपाणी/ प्रतिनिधी
आडी मल्लय्या डोंगर परिसरामध्ये सौंदलगा गावच्या हद्दीत अचानक लागलेल्या आगीमध्ये सर्वे नंबर ३२३, ३५४ मधील शेवाळे, शिंदे, माळी, खाडे आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतातील गवत जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे.
दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात चाऱ्याचे नुकसान झाले आहे. घटनेची माहीती देताच निपाणी येथील अग्निशमन दलाच्या गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण उन्हाचा चटका मोठा असल्याने आणि आग मोठ्या प्रमाणात लागल्याने ती आटोक्यात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे माजी मंत्री श्री वीरकुमार पाटील यांच्या सहकार्याने श्री शाहू साखर कारखाना कागल यांच्या अग्निशमन गाडीला पाचारण करण्यात आले. या अग्निशमन दलातील जवानांनी, येथील शेतकरी बाबासाहेब म्हातुगडे, सुनील शेवाळे, वसंत शेवाळे, शिवाजी खाडे, संदीप शेवाळे, रमेश शेवाळे, विघ्नेश शेवाळे यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

