हुपरीत चांदी वीट भेसळ प्रकरणी कडकडीत बंद

रेंदाळ / प्रतिनिधी

हुपरीमध्ये घडत असलेल्या चांदी वीट भेसळ प्रकरणाचा निषेध व यातील दोषींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी सोमवारी सकाळपासून सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. चांदी उद्योजक धनंजय धायगुडे यांचे उपोषण सुरू होते. सायंकाळी पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी दूरध्वनीवरून उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा झाल्यावर बेमुदत गाव बंद व उपोषण स्थगित करण्यात आले.
कमी टंचांची चांदी वीट कोणत्या ठिकाणी तयार झाली, कोणती यंत्रसामग्री वापरली त्याचा तपास व्हावा, टंच कमी करण्यासाठी कोणता धातू वापरण्यात आला, कोणकोणत्या शहरातील व्यापाऱ्यांना चांदीच्या विटा व दागिने विकले आहेत, या प्रकरणात वापरण्यात आलेली वाहने जप्त करावीत, यासह विविध मागण्यांप्रश्नी सोमवारपासून बेमुदत गाव बंद व उपोषण सुरू करण्यात आले होते. भेसळप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला हुपरी शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला. हुपरी व परिसरातील सामाजिक, राजकीय संघटनांनीदेखील पाठिंबा दिला. सायंकाळी पोलिस उपअधीक्षक साळवे यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

Scroll to Top