अंबाई टँक जलतरण तलाव नूतनीकरण प्रस्ताव तयार करा

कोल्हापूर / प्रतिनिधी

महापालिकेचा अंबाई जलतर तलाव काही वर्षांपासून बंद आहे. जलतरण तलावातील फरशा फुटल्या आहेत. फिल्टरेशन प्लांट बंद आहे. जलतरणपटू, नागरिकांची गैरसोय होत आहे. आ. अमल महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत अंबाई जलतरण तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जलतरण तलाव नूतनीकरणासाठी प्रस्ताव तयार करा, शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी खेचून आणू, अशी ग्वाही दिली.
अंबाई जलतरण तलावासाठी निधी कमी पडू देणार नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा जलतरण तलाव व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. जलतरण तलावाबरोबरच अत्याधुनिक फिल्टरेशन प्लांट, चेंजिंग रूम, शॉवर रूम आणि गॅलरी यांच्या उभारणीमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, अशा सूचना आ. महाडिक यांनी केल्या.
लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून जलतरण तलावाशेजारी आणखी एक छोटेखानी तलाव उभारता येईल का, कारंजा आणि रंकाळा पदपथ उद्यानातील मोडकळीस आलेली खेळणीही बदलण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. लवकरात लवकर निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असेही महाडिक म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, विनय खोपडे उपस्थित होते.

Scroll to Top