कोल्हापूर / प्रतिनिधी
अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील सौरउपकेंद्र त्वरित सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांनी सोमवारी महावितरणचे अधिक्षक अभियंता जी. एम. लटपटे यांना निवेदन दिले.
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी शासनाने सौर उपकेंद्र, मुख्यमंत्री सौर पंप आदी योजना राबविल्या आहेत. अब्दुललाट (ता. शिरोळ) सौर उपकेंद्र प्रस्तावित आहे. या उपकेंद्रासाठी भूसंपादनही झाले आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीवरील शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज पुरवठा करावा, तांत्रिक अडचणीमुळे कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्याची भरपाई जादा तास वीज पुरवठा करून द्यावी आदी मागण्या केल्या. यावेळी कॉ. आपा पाटील, सुरेश शेडबणे, विजय भोजे, रमेश पाटील, रणजित कदम, सतीश कोळी, अजित पाटील, सुभाष गावडे, बाबुराव परीट आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

