इचलकरंजी / प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, त्यांचे जीवनमान सुखकारक आणि विरंगुळा निर्माण व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा हा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांनी केले. असे उपक्रम सातत्याने घेण्यात यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
दैनिक महासत्ता माध्यम प्रायोजित आणि रोटरी क्लब, प्रोबस क्लब, प्रोबस महिला क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ आणि रोटरी अॅन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहसंमेलन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पै बोलत होते. ते पुढे म्हणाले, रोटरी क्लब वेगवेगळ्या वयोगटातील महिला, पुरुष, युवक, युवतींसाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते.
आता ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येत असलेले उपक्रम भविष्यातही सुरूच ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली, प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी स्वागत तर प्रोजेक्ट चेअरमन अभय यळरुटे यांनी प्रास्ताविक केले. महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी, अनुभवाची शिदोरी आपल्या पाठीशी असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेला उपक्रम चांगला असल्याचे नमूद करत प्रशासन म्हणून काम करत असताना नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी, खड्डे विरहित रस्ते, साफसफाईबाबत आपले प्राधान्य राहील असेही त्यांनी नमूद केले, यावेळी वैद्यकीय सेवेबद्दल डॉ. सॅम्युएल भंडारे व सामाजिक कार्याबद्दल अशोक जाधव यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर यतीराज भंडारी, महेंद्र मुथा, विठ्ठलराव डाके, रवींद्र सौंदत्तीकर, डी. एम. कस्तुरे, सागर पाटील, चंद्रकांत मगदूम, सदाशिव कदम, रामचंद्र कुडचे, हमिदा गोरवाडे, पुष्पा मोरे, सौ. स्वाती सातपुते, सौ. संमती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्याकार्यक्रमांमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचे ‘बारी परतवारी’ या विषयावर, सुनिता नाशिककर यांचे ‘ज्येष्ठांची सुरक्षा सायबर सुरक्षा’ या विषयावर, डॉ. अमर अडके यांचे ‘सह्याद्रीच्या गिरीशिखरावर’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर रोटरी तर्फे ‘जुने दिवस आठवूया’ हा कार्यक्रम त्यानंतर संगीत व मिमीक्री कार्यक्रम झाला. यावेळी ऑल इंडिया ज्येष्ठ नागरिक संघावर निवड झाल्याबद्दल रामकुमार सावंत यांचा तर महिला दिनानिमित्त शिवकालीन लाठीकाटे प्रशिक्षिका संजीवनी सुतार यांचाही सत्कार करण्यात आला. आभार चंद्रकांत मगदूम यांनी मानले. सूत्रसंचालन अशोक केसरकर व श्रीमती वैशाली नाईकवडे यांनी केले. या कार्यक्रमास जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
