‘खंडोबा’ची विजयी सलामी

चुरशीच्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ संघाचा 2 विरुद्ध 0 गोल फरकाने पराभव करून खंडोबा तालीम मंडळाने उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामीसह आघाडी मिळविली. उत्तरेश्वर तालीम मंडळ आयोजित या स्पर्धेत मंगळवारी दिमाखात प्रारंभ झाला.

छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे उद्घाटन ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे यांनी ‘किक ऑफ’ने केले. यावेळी पुष्कराज क्षीरसागर, रामदास काटकर, तालमीचे अध्यक्ष दीपक काटकर, रणजित खांडेकर, दीपक बराले, चंदू शेळके, महेश नलवडे, रमेश साळोखे, भाऊ घोडके आदी उपस्थित होते. संयोजन मोहसिन मणेर, रणवीर सावंत, इंद्रजित नलवडे, सत्यजित पाटील, निखिल नारकर, शिवतेज सावंत, ओंकार कसबेकर आदींनी केले.

सामन्याच्या दुसर्‍या मिनिटाला झालेल्या चढाईत खंडोबाच्या नवीन रेग्यूने गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम होती. उत्तरार्धात त्यांच्या कुणाल दळवी, प्रथमेश गावडे, रोहन आडनाईक, आदित्य लायकर यांनी आघाडीत भर घालण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले. यात त्यांनी 80 + मिनिटाला यश आले. प्रभू पोवारने गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पाटाकडील ‘ब’कडून ओंकार देवणे, सार्थक राऊत, रोहन कांबळे, साहिल भोसले, कुपेंद्र पोवार यांनी गोल फेडण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न ‘खंडोबा’चा भक्कम बचाव व गोलरक्षक देबोजित घोषाल यांचे उत्कृष्ट गोलरक्षण यामुळे अपयशी ठरले. यामुळे सामना ‘खंडोबा’ने 2-0 असा जिंकला.

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेतील 8 मार्च रोजी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यातील सामन्यात गैरवर्तन आणि पंचांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार करणार्‍या संकेत नितीन साळोखे (शिवाजी मंडळ) यांच्यावर रेड कार्डची कारवाई झाली होती. याबद्दल ‘केएसए’ने त्याच्यावर दोन सामने बंदीची कारवाई मंगळवारी जाहीर केली.

शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध सुभाषनगर स्पोर्टस्

वेळ : दुपारी 4 वाजता

सामनावीर : प्रभू पोवार (खंडोबा)

लढवय्या : सार्थक राऊत (पाटाकडील ‘ब’)

* आज बुधवारी स्पर्धेला रंगपंचमीची सुट्टी आहे.

Scroll to Top