इचलकरंजी/ प्रतिनिधी
दैनिक महासत्ता माध्यम प्रायोजक आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, प्रोबस क्लब, प्रोबस महिला क्लब, इचलकरंजी ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी अॅन्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन (कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्हा अंतर्गत) चे आयोजन मंगळवार, ता. १८ मार्च रोजी श्रीमंत नारायणराव बा. घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे आयोजन करण्यात आले आहे.
या स्नेहसंमेलनामध्ये श्रेष्ठ व प्रतिभावंत अशा वक्त्यांचे विचार व मार्गदर्शन तसेच आनंदी व सुखी जीवन जगण्याचा मार्ग आदि विषयावर व्याख्याने व चर्चासत्र असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन रोटरी ३१७० चे डिस्टिक गव्हर्नर शरद पै यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील व रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन यतीराज भंडारी हे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत. यावेळी डॉ. सॅम्युएल भंडारे व अशोक जाधव त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात डॉ. उदय निरगुडकर, मुंबई यांचे ‘वारी परतवारी’ या विषयावर व्याख्यान होईल. यानंतर सुनिता नाशिककर मुंबई, निवृत्त पोलीस उपअधीक्षक यांचे ज्येष्ठांची सुरक्षा सायबर सुरक्षा, यावर मार्गदर्शन होईल. दुपारच्या सत्रात डॉ. अमर अडके, कोल्हापूर यांचे सह्याद्रीच्या गिरी शिखरावर याविषयी व्याख्यान होईल. यानंतर संतोष धुमाळ व सहकलाकार यांचा संगीतमय कार्यक्रम व मिमिक्री होईल. शेवटी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी अॅन्स आयोजित जुने दिवस आठवूया हा कार्यक्रम होईल. यावेळी जेष्ठ नागरिक संघटनेच्या ऑल इंडिया कमिटीमध्ये निवड झाल्याबद्दल रामकुमार सावंत गुरुजी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. समारोप समारंभानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
दिवसभर चालणाऱ्या स्नेहसंमेलनामध्ये चहा, नाश्ता जेवण देण्यात येणार आहे. प्रवेश फी नाममात्र १५० रुपये आहे. मर्यादित प्रवेश असल्याने कृपया प्रवेशिकाकरिता रोटरी श्रीमती सोनीदेवी रामबिलास बाहेती सेवा केंद्र, दाते मळा, इचलकरंजी फोन नंबर (०२३०-२४२०६५२) येथे संपर्क साधावा. तरी जेष्ठ नागरिक महिला, युवक, युवती सर्वांनी या स्नेहसंमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
