इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील नंदादीप नेत्रालयाच्या वतीने महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिविर आणि विविध कार्यक्रमांचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. महिला दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांतील यशस्वी आणि आदर्श महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करून मानचिन्हाने त्यांचा गौरव केला.
या उपक्रमास इचलकरंजीसह परिसरातील महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन इचलकरंजीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंजुळा वाघमारे आणि सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचीही मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी नंदादीपच्या डॉ. शारदा हातुंजे यांनी डोळ्यांची प्राथमिक काळजी कशी घ्यावी, वयानुसार नजरेत पडणारा फरक आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी यावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
संपूर्ण मार्च महिन्यामध्ये महिलांसाठी मोफत नेत्र तपासणीचे आयोजन केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले.
