शहराची हद्दवाढ आता नाही तर कधीच होणार नाही. त्यामुळे आक्रमक आंदोलनाची घोषणा रविवारी झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली. आंदोलनावेळी करवीर, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील आमदार आणि पराभूत उमेदवार, खासदार यांनी हद्दवाढीसंदर्भात भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. एक महिन्याच्या आत निर्णय न झाल्यास महापालिकेसमोर बेमुदत उपोषण केले जाईल, अशी घोषणा बाबा इंदूलकर यांनी केली. रविवारी (दि. 23) शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजारामपुरीतील सूर्या मल्टीपर्पज हॉलमध्ये ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी माजी महापौर आर. के. पोवार होते. व्ही. बी. पाटील, अॅड. महादेवराव आडगुळे प्रमुख उपस्थित होते. हद्दवाढीबाबत स्पष्ट भूमिका न घेणार्या नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आर. के. पोवार म्हणाले, हद्दवाढ कितीवेळा मागायची असा प्रश्न आहे. त्यामुळे आता आरपारची लढाई करावी लागेल. कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. तशी इतरांनीही घेतली पाहिजे. आजवर सर्वच नेत्यांकडून हद्दवाढीसंदर्भात जनतेची फसवेगिरी सुरू आहे.
अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, हद्दवाढीसाठी आजवर संयमाने आंदोलन केले. पण पदरात काहीच पडले नाही. आता आंदोलनाची धग वाढवायला हवी. आक्रमक आंदोलन करायला हवे. त्याशिवाय शासनाला जाग येणार नाही. एक महिन्याच्या आत निर्णय झाला नाही. तर मी, दिलीप देसाई आणि पद्मजा तिवले आम्ही तिघेजण महापालिकेच्या दारात बेमुदत उपोषण करू. हा संदर्भ देत आर. के. पोवार यांनी तुम्ही तिघेच का? आम्ही देखील तुमच्यासोबत उपोषणास बसू,असे सांगितले.
व्ही. बी. पाटील म्हणाले, हद्दवाढीवरून ग्रामीण-शहरी संघर्ष टाळण्यासाठी समन्वय साधून निर्णय घेतला पाहिजे. हद्दवाढीबाबत शासनानेच स्पष्ट भूमिका घ्यायला हवी. के्रडाईचे अध्यक्ष के. पी. खोत म्हणाले, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत आता शासनाने लवकर निर्णय घेतला पाहिजे. ग्रामीण आणि शहरी असा संघर्ष टाळला पाहिजे. हद्दवाढ गरजेचीच आहे. प्रा. जयंत पाटील म्हणाले, 1972 पासून महापालिकेचे नेतृत्व करणारे नेते शहराबाहेरचे होते. त्यामुळे हद्दवाढ झाली नाही. आता तीन आमदार, पराभूत उमेदवार आणि खासदारांना एकत्र आणावे लागेल. तरच हद्दवाढ होणार आहे.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे म्हणाले, हद्दवाढ झाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. विनाकारण विरोध सुरू आहे. घरफाळा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणी भांडवली मूल्यावर आधारितच आहे. त्यामुळे करवाढ होणार हा प्रपोगंडा टाळला पाहिजे. विकासासाठी हद्दवाढ ही गरजेचीच आहे. यावेळी महादेवराव आडगुळे, राजू शिंगाडे, प्रार्थना समर्थ, मायादेवी भंडारे, अनिल कदम, भूपाल शेटे, विलास वास्कर, प्रतिज्ञा उत्तुरे आदींसह उपस्थित माजी नगरसेवकांची भाषणे झाली. या बैठकीला दिलीप देसाई, दुर्गेश लिंग्रस, रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण, पद्मजा तिवले, बाबा पार्टे, शिवाजीराव जाधव, राजू जाधव, नीलिमा व्हटकर आदी उपस्थित होते.
