बालिंगे-दोनवडे पुलाच्या भरावाची लवकरच पाहणी

कोल्हापूर – गगनबावडा मार्गावरील बालिंगे – दोनवडेदरम्यान होणार्‍या पुलाच्या भराव कामामुळे या परिसरातील सुमारे 20 ते 25 गावांना महापुराचा फटका बसणार आहे. त्यामुळे या ठिकाणी बास्केट ब्रिज उभारावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय बैठक झाली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रमुख उपस्थित होते. दोन दिवसांत यासंदर्भात पाहणी करून पुढचा निर्णय घेतला जाईल, असे चीफ इंजिनिअर शेलार यांनी बैठकीत ऑनलाईन सहभागी होऊन सांगितले.

या पुलाचा भराव 20 ते 21 फूट उंचीने करण्यात येणार आहे. त्यामुळे चाळीस ते पन्नास गावांना महापुराचा फटका बसणार आहे. हे टाळायचे असेल, तर या ठिकाणी भराव न टाकता कमानीद्वारे पुलाचे काम झाले पाहिजे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी व्यक्त केल्या. भरावाची पाहणी करून यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, लोकांच्या भावना लक्षात घेऊन भरावाचे काम रद्द करून येथे बास्केट ब्रिज उभारला पाहिजे. येथील कामाची पाहणी ताबडतोब करावी.

बाळासाहेब खाडे म्हणाले, यापूर्वी आलेल्या पुराचा अनुभव लक्षात घेता बालिंगे ते दोनवडेदरम्यान होणार्‍या पुलाचा भराव 21 फुटांच्या वर असणार आहे. त्यामुळे अनेक गावे पुरात जाणार आहेत. हे प्रशासनाने लक्षात घ्यावे. कमानीद्वारे पूल उभारावा. पूरग्रस्त बचाव समितीचे बाजीराव खाडे म्हणाले, रुंदीकरण थांबवून पिलर व कमानीचे काम सुरू करावे व बदललेले स्ट्रक्चर लवकरात लवकर मंजूर करून आणावे अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बैठकीस दोनवडेचे सरपंच सर्जेराव शिंदे, उद्योगपती अमर पाटील- शिंगणापूरकर, बुद्धिराज पाटील, सज्जन पाटील, पाडळी खुर्दचे सरपंच तानाजी पालकर यांच्यासह कोगे, हणमंतवाडी, भामटे, साबळेवाडी, कळंबे आदी गावांचे सरपंच उपस्थित होते.

Scroll to Top