मिरज / प्रतिनिधी
मिरज एमआयडीसी परिसरात शंभर फुटी रस्त्यालगत असलेल्या प्लास्टिकच्या भंगार गोडाऊनला बुधवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये भंगार गोडाऊन मधील प्लास्टिकच्या साहित्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. यामुळे आगीचे आणि धुराचे लोट उठू लागले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी ७ अग्निशमन वाहनांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून दीड तासात येथील आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतेही जखमी झाले नाही.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मिरजेतील अग्निशमन दलास एमआयडीसी परिसरातील भंगार गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या ७ वाहनांसह अधिकारी व जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून येथील आग आटोक्यात आणली.
घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या भंगार गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा होता. येथील पालापाचोळा व कचरा पेटवल्यानंतर त्यातून येथील प्लास्टिकला आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. यापूर्वीही येथील प्लास्टिक जळाल्याचेही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. भंगार गोडाऊनची आरसीसी इमारत आगीपासून वाचविण्यात अग्निशमन दलास यश आले त्यामुळे येथील नुकसान टळले. मात्र आगीमुळे येथील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाचे अधिकारी सुनील माळी यांच्यासह कर्मचारी विजय पवार, विनोद मगदूम, इकबाल मुल्ला, जावेद मुश्रीफ, मोहम्मदअली शेख, राजेंद्र कदम, विजय कांबळे, सागर गायकवाड, प्रसाद माने, बाळासो पुणेकर लिंगाप्पा कांबळे, संतोष हाके, सागर भातमारे यांच्यासह सांगली व कुपवाड एमआयडीसी येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी येथील आग आटोक्यात आणली.
