अशोकराव माने इन्स्टिट्यूटमधील कॅम्पसमध्ये १३७ पक्ष्यांचे वास्तव्य

पेठ वडगाव / प्रतिनिधी

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये ‘ग्रेट बँक यार्ड बर्ड काऊंट’चे औचित्य साधून कॅम्पसमधील उपलब्ध पक्षी गणना व निरीक्षण उपक्रम राबविण्यात आला. या निरीक्षणामध्ये एकूण २९ प्रकारचे १३७ पक्षी आढळले. पक्षी निरीक्षण आणि गणनेची नोंद ई-वर्ड संकेतस्थळावर करण्यात आली आहे.
या पक्षी निरीक्षण व गणनेमध्ये पारवा, कंठवाला होला, छोटा तपकिरी होला, कोकीळ, माळ टिटवी, टिटवी, गाय बगळा, कापशी घार, शिक्रा, घार, ब्राह्मणी घार, वेडा राघू, राखी कोतवाल, कावळा, राखी वटवट्या, लाल बुड्याबुलबुल, गुलाबी मैना, भांगपाडी मैना, चिरक, कवड्या, गप्पिदास, जांभळा शिंजीर, चिमणी, पांढऱ्या भुवईचा बुलबुल, खंड्या, तारवाली, भिंगरी, साळुंखी, जांभळ्या पुठ्याचा शिंजीर, राखी तित्तर आदी पक्ष्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
पक्ष्यांचे अस्तित्व निसर्गाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. नागरीकरणामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे मत अध्यक्ष विजयसिंह माने यांनी व्यक्त केले.
यामध्ये निसर्गप्रेमी मित्र संघटनेचे डॉ. अमोल पाटील, डॉ. शुभम करडे, डॉ. नीलिमा पाटील, श्री. खंदारे तसेच इन्स्टिट्यूटच्या इको क्लबचे समन्वयक प्रा. युवराज चोकाककर आणि विद्यार्थी, सदस्यांचा सहभाग होता. उपक्रमासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अजय देशमुख, उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी, डीन स्टुडंट अफेयर्स डॉ. जयदीप शिंदे आणि डीन अॅकॅडमिक्स डॉ. सीमा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top