कोल्हापूर – मिरज दुहेरीकरण फायनल लोकेशन सर्व्हेचा प्रस्ताव असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी सांगितले. याच मार्गावर रुकडी आणि जयसिंगपूर स्थानक येथे लूपलाईन उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांनी कोल्हापूर स्थानकाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, पुणे – मिरज मार्गाचे दुहेरीकरणाचे काम या वर्षअखेरीस पूर्ण होईल. यामुळे या मार्गावरील गाड्यांची संख्या आणि वेळ वाढणार आहे. कोल्हापूर-मिरज मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेचा प्रस्ताव तयार केला. लवकरच तो सादर केला जाणार आहे. दरम्यान रुकडी आणि जयसिंगपूर स्थानकावर नव्या लूपलाईनला मंजुरी दिली आहे. त्याचे काम पूर्ण होताच या मार्गावरील गाड्यांचा क्रॉसिंगचा वेळ कमी होणार आहे. वळीवडे (गांधीनगर) स्थानकावर काही गाड्यांच्या थांब्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळी अंबाबाईचे दर्शन घेऊन मीना यांनी स्थानकाची पाहणी केली. रनिंग रूम, पार्सल विभाग, तिकीट निरीक्षक विभाग, बुकिंग कार्यालय आदी विभागांची त्यांनी तपासणी केली. यावेळी प्रधान मुख्य परिचलन व्यवस्थापक शामसुंदर गुप्ता, पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, विभागीय परिचलन व्यवस्थापक रामदास भिसे आदींसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर-पुणे मार्गावर सध्या धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस लवकरच पूर्वीप्रमाणे मुंबईपर्यंत धावेल, असे मीना यांनी सांगितले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वेने सुचवलेल्या त्रुटी दूर करून मंत्रालयाच्या एनपीजी (नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप)कडे सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
