सूर्यकांत चषक छावा क्रीडा मंडळाने पटकाविला

कोल्हापूर / प्रतिनिधी

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील कबड्डी रावज अॅकॅडमी आयोजित जिल्हास्तरीय सूर्यकांत चषक कबड्डी स्पर्धेत पुलाची शिरोली छावा क्रीडा मंडळाने अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात छावा क्रीडा मंडळ पुलाची शिरोलीने बाल भारत क्रीडा मंडळ इचलकरंजीचा २५ विरुद्ध १५ असा पराभव केला.
५० किलो वजनी गटातील या स्पर्धेत जिल्ह्यातील ८ नामवंत संघांनी सहभाग घेतला. उद्घाटन जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. संभाजी पाटील व दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. अण्णा गावडे, डॉ. रमेश भेंडिगिरी, सौ. उमा भेंडिगिरी, अजित पाटील, सयाजी पाटील आदी उपस्थित होते.
विजयी संघास कायमचा चषक व रोख १० हजार, तर उपविजयी संघास कायमचा चषक व ७ हजार रुपये, तृतीय क्रमांकास महालक्ष्मी स्पोर्टस् (पेठ वडगाव) व चतुर्थ क्रमांक शिवप्रेमी क्रीडा मंडळ (शिरोली) यांना प्रत्येकी ३ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अष्टपैलू खेळाडू सर्वेश नेहरे (छावा क्रीडा मंडळ), उत्कृष्ट पकड – सोहम सनगर (महालक्ष्मी स्पोर्टस्) व उत्कृष्ट चढाई श्रेयश पाटील (बाल भारत क्रीडा मंडळ) यांची निवड करण्यात आली. बक्षीस समारंभ दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर, सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य एस. एस. चव्हाण, डॉ. रमेश भेंडिगिरी, सौ. अनिजा सूर्यवंशी, ओजस शिंदे, वैजयंती पाटील, दीपक कुंभार, मनोहर घोलपे, प्राचार्य वाय. एस. पोवार, प्राचार्य आर. आय. पोवार आदी उपस्थित होते.

Scroll to Top