इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजीत सुरळीत पाणी पुरवठा करणे महापालिकेसाठी तारेवरची कसरत बनली आहे. वारंवार होणारी गळती व पंचगंगा नदीची कमी झालेली पातळी यामुळे पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. सध्या पातळीत वाढ झाली असली तरी बंधाऱ्यावर बरगे नसल्यामुळे सर्व पाणी वाहून पुढच्या दिशेने जात आहे.
काही दिवसांपासून पंचगंगेचे पात्र कोरडे पडले होते. याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. सध्या नदी दुथडी भरून वाहत आहे. परंतु वाळू उपशामुळे एका ठिकाणी खड्डा बनला आहे. त्या ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. पात्रातील काही भाग कोरडा तर काही भागात पाणी वाहत आहे. बंधाऱ्यातील बरगे गायब असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पुढे प्रवाहित होत आहे. परिणामी इचलकरंजी शहराला अंशतः पाणी पुरवठा करणारी पंचगंगा योजना लवकरच बंद पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाईची भीती आहे. कृष्णा व पंचगंगा योजनांतून उपलब्ध होणारे पाणी एकत्रित केले जाते. त्यातून शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाते. दोन्ही योजना सुरू ठेवण्यावर महापालिकेचा भर असतो. बंधाऱ्याला लोखंडी वरगे घालण्यासंदर्भात निविदा काढण्याचे काम हाती घेतले आहे. प्रक्रिया लवकर करण्याची गरज आहे.
