कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन आयोजित सिनिअर निमंत्रित (दोन दिवशीय) सुपर लीग क्रिकेट स्पर्धेतील रविवारचा सामना बिलियंट क्रिकेट मैदान पुणे येथे कोल्हापूर जिल्हा संघ विरुद्ध नाशिक जिल्हा संघ यांच्यात झाला. यात कोल्हापूर जिल्हा संघाने १० विकेटनी विजय संपादन केला.
प्रथम फलदांजी करताना कोल्हापूर जिल्हा संघाने ७० षटकांत सर्वबाद २७१ धावा केल्या. यात अनिकेत नलवडेने ६७, रणजित निकमने ४०, महेश मस्केने ३०, क्षितिज पाटीलने ३३, वैभव पाटीलने २२, विवेक पाटीलने २१, विशांत मोरेने १९ धावा केल्या. नाशिक जिल्हा संघाकडून यासीर शेखने ३, सत्यजित बच्छाव व प्रतीक तिवारी यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. उत्तरादाखल नाशिक जिल्हा संघ ४४.१ षटकांत सर्वबाद ११७ धावांपर्यंत मजल मारू शकला. सत्यजित बछावने सर्वाधिक २९ धावा केल्या. कोल्हापूर जिल्हा संघाच्या अभिषेक निषाद, श्रेयस चव्हाण व शुभम माने यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.
कोल्हापूरने पहिल्या डावात भक्कम १५४ धावांची आघाडी घेत नाशिक संघाला फॉलोऑन दिला. नाशिक जिल्हा संघाने दुसऱ्या डावात ४५.५ षटकांत सर्वबाद १६८ धावा केल्या. मुस्तानसर कांचवालाने ५९, रवींद्र माटेचा याने ४७ धावा केल्या. कोल्हापूरच्या अभिषेक निषादने ६, क्षितिज पाटीलने ४ विकेटस् घेतल्या. कोल्हापूर जिल्हा संघाने १४ धावांचे आव्हान ३ षटकांत बिनबाद १५ धावांसह आरामात पूर्ण करत विजय साजरा केला.
