नृसिंहवाडी / प्रतिनिधी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात वाढत जाणारी गर्दी लक्षात घेऊन येथे येणाऱ्या शेकडो भाविकांच्या सोयीसाठी २५००० लिटरचा शुद्ध पाणी फिल्टरचा नव्याने प्लांट बसवण्याचा निर्धार दत्त देवस्थान समितीने केला आहे. याची माहिती संस्थांनचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी दिली.
येथील करंदीकर अष्टविनायक सभागृहात ब्राह्मण सभेच्या वतीने देवस्थान पदाधिकारी व विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मंदिराच्या उत्तर बाजूस मुख्य दगडी घाटावर नव्याने पायऱ्या उभ्या केल्या आहेत. दक्षिण बाजूस राम मंदिराच्यामागे घाट पायऱ्यांचे काम सुरू आहे. असे विशद करून ते पुढे म्हणाले, शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर देवस्थानच्या जागेवर सव्वाशे खोल्यांची सुसज्ज धर्मशाळा उभारण्याचा मनोदय देवस्थान समितीचा आहे.
ब्राह्मण सभेचे अध्यक्ष योगेश मावळंगकर यांनी पुजारी यांचा सत्कार केला. सेक्रेटरी गजानन पुजारी विश्वस्त ओंकार पुजारी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच ब्राह्मण सभा पदाधिकारी यांचाही सत्कार झाला. ब्राह्मण सभेचे माजी अध्यक्ष मुकुंद पुजारी, सेक्रेटरी विनोद पुजारी, गिरीश खोंबारे, संदीप वाडीकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त सदाशिव पुजारी, संतोष खोंबारे, सोनू पुजारी, पांडुरंग पुजारी, विपुल हावळे, ब्राह्मण सभेचे चिटणीस बाळासाहेब बालासकर, विक्रांत पुजारी, पुंडलिक पुजारी, दत्तात्रय जमदग्नी, विलास सोनीकर, चंद्रकांत कोडणीकर, सौरभ खोंबारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत गिरीश खोंबारे यांनी तर आभार संदीप वाडीकर यांनी मानले.
