रणहलगीच्या ठेक्यावर आणि तुतारीच्या गजरात आक्रमक पवित्रा घेऊन खेळला जाणारा शिवकालीन युद्धकला लढवय्या महाराष्ट्राचा रांगडा वारसा आहे. मात्र, पारंपरिक मर्दानी खेळाकडे सातत्याने दुर्लक्ष होत. सध्या सुरू असणार्या महाकुंभ या पारंपरिक खेळाच्या स्पर्धेतही शिवकालीन युद्धकलेचा सहभाग करण्यात आलेला नाही. यामुळे हा वारसा जपणार्या तालीम संस्था, मंडळे आणि पथकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
‘गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ… जोडूया भारतीय संस्कृतीशी नाळ’ हे ब—ीद वाक्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीचे औचित्य साधत पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून यंदा महाकुंभ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 2 ते 9 मार्च या कालावधीत क्रीडा महाकुंभ राज्यात सुरू राहणार आहे.
क्रीडा महाकुंभात कब्बडी आणि खो-खो या जागतिक दर्जाच्या खेळांबरोबर लगोरी, लेझीम, लंगडी, विटी-दांडू, दंड बैठक, पंजा लढवणे, रस्सीखेच, दोरीवरच्या उड्या, फुगडी आणि लगोरी या पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. आयटीआय स्तर, जिल्हास्तर आणि विभागीय स्तरांवर ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिक तर सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. कौशल्य विकास विभागांतर्गत असणार्या व्यवसाय प्रशिक्षण आणि संचालनालय आणि पुणे येथील क्रीडा भारती या संस्थेच्या सहयोगाने या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
