प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून यासाठी निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी मोटारसायकल, मोबाईल, गॅस असणार्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत नव्हता; परंतु आता दुसर्या टप्प्यातील घरकुलासाठी बदलण्यात आलेल्या निकषांमुळे मोटारसायकल, मोबाईल, गॅस असणारे लोक देखील आता घरकुलासाठी पात्र असणार आहेत. या योजनेसाठी नव्याने सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करावे, असे जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये पाच वर्षांमध्ये म्हणजे 2029 पर्यंत 2 कोटी घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी जुन्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. पूर्वी मोटारसायकल, मोबाईल, गॅस असणार्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे अनेक नागरिक या योजनेपासून वंचित राहू लागल्याने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण दुसरा टप्प्यासाठी नवीन निकष जाहीर केले आहेत. यापूर्वी 2018 मध्ये झालेल्या आवास योजनेच्या सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये (प्राधान्य यादी) समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले; परंतु सद्यस्थितीत पात्र असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसर्या टप्प्यात सर्वेक्षण करण्याच्या सूचना केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने दिल्या आहेत. या सर्वेक्षणासाठी सुधारित आवास (उररी+) माोबाईल अॅप तयार करण्यात आले असून त्यामध्ये सर्वेक्षकांची नोंदणी करावयाची आहे. यासाठी प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांना केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तीन किंवा चारचाकी वाहन किंवा कृषी उपकर असणारे कुटुंब, 50 हजार रुपयांपेक्षा अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंब, सरकारी कर्मचारी असलेले कुटुंब ,दरमहा 15 हजारांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले कुटुंब ,आयकर व व्यावसायिक कर भरणारे कुटुंब ,2.5 एकरहून अधिक बागायती शेतजमीन असणारे कुटुंब, 5 एकरपेक्षा जास्त जिरायती शेतजमीन असणारे कुटुंब.
