कोल्हापूर / प्रतिनिधी
हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी व ज्येष्ठ मल्लांच्या विधवा पत्नींना दिले जाणारे मानधन गतवर्षीपासून थकीत आहे. मानधन ३१ मार्चपर्यंत न मिळाल्यास क्रीडा कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा लोककल्याण क्रीडा फाऊंडेशनतर्फे दिला असून मागणीचे निवेदन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसुळ यांना दिले आहे.
एक वर्षाचा कालावधी होऊन गेला तरी अद्याप हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी व त्यांच्या विधवा पत्नी यांना सन २०२४ चे मानधन मिळालेले नाही.
गतवर्षीपासून नामवंत मल्लांचे मानधन ६ हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्यात आले आहे. शासनाच्या क्रीडा विभागाकडून हे मानधन न मिळाल्याने आजच्या महागाईच्या काळात वयोवृद्ध मल्लांना औषध पाण्याचा खर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यांना उपजीविका करणे अवघड झाले आहे. कोल्हापूरचे नाव सर्वदूर पोहोचविणाऱ्या मल्लांप्रती क्रीडा कार्यालयाची असणारी उदासीनता चीड आणणारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात सुहास साळोखे, संजय पडवळे, प्रकाश आमते, उत्तम तिबिले, जयंत मिठारी, राजेंद्र खद्रे, विजय साळोखे, अभिषेक शिंदे आदींचा समावेश आहे.
