सिग्नलच्या विद्युत पेटीतून पाणी गळती

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी चौकातील सिग्नलच्या लोखंडी खांबाच्या विद्युत पेटीतून पाण्याची धार लागल्याचा अजब प्रकार नागरिकांना पाहायला मिळाला. इचलकरंजी शहराला आठ दिवसांतून एकदा पाणी मिळत असून यामध्ये भर म्हणून की काय, सिग्नलच्या खांबातून पाणी येत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
इचलकरंजी महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात वाहतूक शाखेने सिग्नलसाठी खांब उभे केले आहेत. अनेक दिवसांपासून एका खांबाच्या विद्युत पेटीतून पाणी बाहेर पडत आहे, तर याच खांबावर सिग्नलच्या दिशाही दिसत आहेत. पाणी थेट विद्युत पेटीतून बाहेर पडत असल्यामुळे या पाण्याला विद्युत तारेचा स्पर्श होऊ शकतो. यातून मोठी दुर्घटनाही घडू शकते. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Scroll to Top