आळतेत पत्रावळी बनविणारा कारखाना भस्मसात ; चाळीस कोटीचे नुकसान

कारखाना परिसरात आगीचे व धुराचे लोट ४०० महिला पुरुष कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

हातकणंगले / प्रतिनिधी
आळते (ता. हातकणंगले) येथील रामलिंग मंदिर मार्गावरील इको फ्रेंडली द्रोण व पत्रावळी बनवणाऱ्या उद्योगपती अनिल मालानी यांच्या मालकीच्या ग्रीनवेल इको प्रॉडक्ट प्रा . लि . कंपनीला आज शनिवार ता . १ मार्च रोजी सकाळी अकराच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली . आगीत संपूर्ण कारखाना जळून भस्मसात झाला असून सुमारे चाळीस कोटीचे नुकसान झाले आहे . यावेळी कारखान्यात काम करत असलेल्या पावणेदोनशे महिला व पुरुष कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही . आगीची माहिती मिळताच इचलकरंजी , कोल्हापूर, वडगाव, जयसिंगपूर, हुपरी, हातकणंगले, पंचगंगा साखर कारखाना , शरद साखर कारखाना , घोडावत उद्योग समूह , एमआयडीसी शिरोली यांच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . पण कारखान्यात सर्वच मटेरियल कागदी ज्वलनशील असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले . त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास अंशःत यश मिळाले असुन रात्री उशिरापर्यंत आग धुमसत होती . तसेच आगीचे कोणतेच कारण समजू शकले नाही .
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , शनिवार ता . १ मार्च रोजी ग्रीनवेल इको प्रॉडक्ट कारखान्याला सकाळी अकराच्या दरम्यान अचानक आग लागली . यावेळी कारखान्यात पावणेदोनशे महिला व पुरुष कामगार काम करीत होते . अचानक आग लागलेली पाहून एकच हा हाहाकार उडाला . प्रथम तात्काळ सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले . कारखान्यात द्रोण व पत्रावळी बनवण्यासाठी कागदासारख्या हलक्या वजनाचा कच्चामाल व तयार द्रोण, पत्रावळी व फर्नेस ऑईलचा मोठा स्टॉक होता . हा सर्व कच्चामाल ज्वलनशील असल्याने काही मिनिटातच आगीने रौद्ररूप धारण केले . कारखान्यातून आगीचे, धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले . आगीची बातमी आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली . त्यामुळे महिला -पुरुष कामगारांचे नातेवाईक घाबरले . त्यांनी कारखाना परिसरात गर्दी केली . सर्व कामगार सुरक्षित असल्याचे पाहून नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला .
आगीने रौद्ररूप धारण केल्याने इचलकरंजी , कोल्हापूर महानगरपालिकेचे वडगाव , हातकणंगले , हुपरी , जयसिंगपूर , नगरपंचायतीचे तसेच शरद व पंचगंगा साखर कारखाना , एमआयडीसी शिरोली व घोडावत उद्योग समूहाचे असे जवळपास दहा ते बारा अग्निशामन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले . प्रत्येक अग्निशामक टँकरने जवळपास आठ ते दहा वेळा पाण्याचा मारा केला . मात्र सर्व मटेरियल ज्वलनशील असल्याने आग आटोक्यात आणण्यास अनेक अडचणी येत होत्या . त्यातच कारखान्यात फर्नेस ऑइलचा साठा मोठ्या असल्याने आगीने पुन्हा रौद्र रूप धारण केले . यावेळी फर्नेस ऑईलच्या आगीवर कितीही पाण्याचा मारा केला तरी आग विजून पुन्हा भडकत होती . अखेर अग्निशामक दलाने तब्बल चार ते पाच तास प्रयत्न करून थोड्याफार प्रमाणात आग आटोक्यात आणली . पण रात्री उशिरापर्यंत कारखान्यात आग धुमसत होती .
आगीमध्ये सुमारे ४० कोटीचे नुकसान झाले असून त्यामध्ये द्रोण , पत्रावळी बनवण्याचा कच्चा तसेच तयार माल , फर्नेस ऑइल कारखान्याचे पत्रे , लोखंडी अँगलसह सर्व कारखाना इमारत पूर्ण जळून खाक झाली आहे . मात्र आगीमुळे कारखान्यात काम करणाऱ्या तीन शिफ्टमध्ये ४०० महिला पुरुष कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याने घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे .

फोटो ओळ –
आळते – येथील ग्रीनवेल इको प्रॉडक्ट प्रा. लि. कंपनीला लागलेल्या आगीमुळे बाहेर पडत असलेले धुराचे लोट

Scroll to Top