इचलकरंजी/ प्रतिनिधी
येथील आयजीएम इस्पितळात ४० विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग कॉलेज सुरु करण्याचा तातडीने निर्णय घेवून तत्काळ शासन निर्णय केल्याबद्दल जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबईत भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त केले.
इचलकरंजी आयजीएम मध्ये येथे नर्सिंग कॉलेज सुरु केल्यास आवश्यक कर्मचारी उपलब्ध होतील, अशी मागणी खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी आयजीएम भेटी दरम्यान मंत्री आबिटकर यांच्याकडे केली होती. त्यावेळी मंत्री आबिटकर यांनी याबाबत शब्द दिला होता. महिन्याभरात नर्सिंग कॉलेजला मंजूरी देण्याबाबत शासन निर्णय करुन त्यांनी शब्द पाळला. या पार्श्वभूमीवर रविंद्र माने यांनी त्यांची भेट घेवून आभार मानले.
यावर आबिटकर यांनी इचलकरंजीसाठी जे काही करता येईल त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजी प्रमुख व विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, शिवसेना उपनेते माजी खासदार राहुल शेवाळे हे उपस्थित होते.
