इचलकरंजीतील रस्त्यांची वाताहत रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे, चरी पडल्याने वाहनधारकांची कसरत

इचलकरंजी/ प्रतिनिधी

शहरातील मुख्य रस्त्यांसह इतर अनेक लहान-मोठ्या रस्त्यांची मोठी वाताहत झाली आहे. अनेक रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे, चरी पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागते. सातत्याने या खराब रस्त्यांवरून वाहने चालविल्याने हाडे खिळखिळी होऊ लागली आहेत. तेव्हा नव्याने रूजू झालेल्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी खराब रस्त्यांबाबत हालचाल करून डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. इचलकरंजी शहराची दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यामानाने महानगरपालिकेकडून पुरेशा सोयीसुविधा मिळत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
उद्योग नगरी म्हणून परिचित असलेल्या शहरामध्ये अनेक औद्योगिक वसाहती आहेत. मात्र, वसाहतीमध्ये सुविधांची वानवा आहे. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अशा रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
तसेच कलानगर ते चंदूर रस्ता, गावभाग परिसरातील लहान मोठे रस्ते, सुंदर बाग परिसर, रिंग रोड, गणेनगर, जवाहरनगर, सांगली रस्ता, व्यंकटराव परिसर, स्टेशन रोड परिसरातील रस्ते आदी भागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत.
तसेच रस्त्यांवर लहान-मोठ्या चरी पडल्याने या रस्त्यावरून वाहन चालवताना छोटे-मोठे अपघात घडत आहेत. तसेच वारंवार खड्ड्यातून गेल्यामुळे अनेकांना अंगदुखी, हाडांचे व्याधी जडत आहेत. तेव्हा तातडीने रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Scroll to Top