कोल्हापूर / प्रतिनिधी
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या जिल्हा परिषद क्रीडा महोत्सवाची सोमवारी सायंकाळी सांगता झाली. या क्रीडा महोत्सवात सलग दुसऱ्या वर्षी भुदरगड तालुक्याने आपले वर्चस्व राखत यावर्षीचेही अजिंक्यपद पटकावले. मुख्यालयाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील विजेत्यांना आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू स्वरुप पन्हाळकर व आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळपटू सम्मेद शेटे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. होते. या स्पर्धेत सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ११०० महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या स्पर्धेत भुदरगडने यावर्षीही आपले वर्चस्व राखत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले. राधानगरी तालुका तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
