भारताची पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉल मिश्रणाची उद्दिष्टपूर्ती?

संग्रहित छायाचित्र

देशातील नागरिकांसाठी एक सुखद धक्का देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने अत्यंतमहत्त्वाकांक्षी म्हणून सुरू केलेल्या पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टाची पूर्ती झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच देशातील इथेनॉल उद्योगाने ही क्रांती घडवून आणण्यास मोठा हातभार लावला आहे.

इथेनॉल उद्योगाकडे असलेल्या आकडेवारीनुसार 20 टक्के मिश्रणाची उद्दिष्टपूर्ती झाल्याचे स्पष्ट होत असले, तरी केंद्राकडून त्याची औपचारिक घोषणा बाकी आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये अपूर्व योगदान देणारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी लवकरच याची अधिकृत घोषणा करतील, असे खात्रीलायक वृत्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप आघाडीच्या सरकारने 2018-19 या इथेनॉल वर्षामध्ये ‘नॅशनल पॉलिसी ऑफ बायोफ्युएल्स’ हे महत्त्वाकांक्षी धोरण जाहीर केले होते. यानुसार पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी 2030 हे उद्दिष्ट वर्ष म्हणून निश्चित केले होते. तथापि, या प्रकल्पासाठी लागणारे आवश्यक ते सर्व निर्णय धडाडीने घेतले गेले. इथेनॉलच्या हमीभावापासून इथेनॉल उद्योगाला अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सर्व आघाड्यांवर शासनाने ठाम भूमिका घेतली. यामुळे उद्दिष्टाच्या तब्बल पाच वर्षे अगोदर 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.

भारतामध्ये 2025 सालातील पेट्रोलच्या एकूण अपेक्षित वापराचा विचार करता 20 टक्के मिश्रणासाठी एकूण 1 हजार 16 कोटी लिटर्स इतकी इथेनॉलची गरज आवश्यक होती. इथेनॉलच्या अन्य वापराचा विचार करता देशात एकूण 1 हजार 350 कोटी लिटर्स इथेनॉल निर्माण होणे अपेक्षित आहे. याचा अर्थ केवळ पेट्रोलमधील मिश्रणासाठी महिन्याला सरासरी 84 कोटी लिटर्स इथेनॉलची आवश्यकता आहे. जानेवारी 2025 मध्ये देशात 82 कोटी 10 लाख लिटर्स इथेनॉल पेट्रोलमधील मिश्रणासाठी वापरण्यात आले. त्याचवेळी पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाने 19.6 टक्क्यांवर येऊन उद्दिष्टाचा उंबरठा शिवण्यासाठी काही कालावधी आवश्यक आहे, याचा सूचक इशारा दिला होता.

इथेनॉल उद्योगाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच 63 कोटी लिटर्स इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण झाले आहे. याचा अर्थ भारताने पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टपूर्तीचा झेंडा फडकविला असून आता भारताची 30 टक्के मिश्रणाकडे वाटचाल सुरू होणार आहे.
2014 ते 2024 या 10 वर्षांच्या कालावधीत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणामुळे भारताचे इंधनावर खर्ची पडणारे 1 लाख 6 हजार 72 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले. 544 लाख मेट्रिक टन कार्बन संयुगांचे उत्सर्जन रोखता येणे शक्य झाले आणि 181 लाख मेट्रिक टन क्रूडची आयात इथेनॉलमुळे थांबविता येणे शक्य झाले. यामुळेच भारतीय तेल उद्योगाच्या क्षेत्रामध्ये सोनियाचा दिवस उजाडला आहे.

Scroll to Top