इचलकरंजी / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
यश-अपयश हे कायमस्वरुपी नसते. अपयशाचा न्युनगंड न बाळगता आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करुन परीक्षांना सामोरे जावा. शॉर्टकर्ट मार्गाने मिळविलेले यश फार काळ टिकत नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी, आई-वडीलांचे स्वप्न पूर्णत्वासाठी आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रम करा, असा सल्ला मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिला.
येथील राजर्षि छत्रपती शाहू हायस्कुलमधील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर खारगे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मार्गदर्शन केले. या उपक्रमात शाहू हायस्कुलचे १५५ विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. २१ फेब्रुवारीपासून १० वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खारगे यांनी ही संकल्पना राबविली.
याप्रसंगी मुख्याध्यापक शंकर पोवार, उपमुख्याध्यापक पी. ए. पाटील, मंदाकिनी कुंभार, राजू नदाफ, रफिक मुल्ला, शंकर पुजारी, विजय हावळ, सुनिल मांगलेकर, वसंतराव सपकाळ, टी. ए. जगताप, पी. एल. पाटील, एस. टी. पवार, एस. जी. कुंभार आदींसह माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
