शिवाजी पेठ शिवजयंती सोहळ्यास आजपासून प्रारंभ

कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

शिवाजी पेठेतील श्री शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत शनिवार, दि. १५ ते गुरुवार, दि. २० फेब्रुवारी या कालावधीत उभा मारुती चौकात विविध कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, सचिव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवाजी पेठेतील ९२ तालीम संस्था व तरुण मंडळांची शिखर संस्था असणाऱ्या शिवाजी तरुण मंडळातर्फे दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जाते. उत्सवासाठी उभा मारुती चौकात ६० बाय ४० फुटांच्या भव्य शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. पत्रकार परिषदेस रवींद्र साळोखे, लालासो गायकवाड, राहुल इंगवले, करणसिंह पाटील, प्रसाद इंगवले, राज गाडगीळ, अक्षय शिंदे, ओंकार डकरे, अभिषेक शिंदे, रोहन यादव, विक्रमसिंह जरग, भरत जाधव आदी उपस्थित होते.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
उत्सवाची सुरुवात शनिवारी (दि. १५) सकाळी १० वाजता, अश्वारुढ शिवमूर्ती आगमनाने होईल. दसरा चौकातून मिरवणुकीचा प्रारंभ होईल. रविवारी (दि. १६) सायं. ७ वाजता शिवशाहीर दिलीप सावंत यांचा पोवाडा कार्यक्रम, सोमवारी (दि. १७) रोजी सकाळी ७ वाजता शिवाजी मंदिरात आरोग्य शिबिर, सायं. ७ वाजता, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री ९ वा. मरगाई दत्तपंथी सोंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल.
मंगळवारी (दि. १८) ७ वाजता शिवाजी पेठ भूषण सन्मानचिन्ह प्रदान सोहळा आणि रात्री ९ वाजता, छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारीत छावा चित्रपटाचे प्रदर्शन भव्य स्क्रीनवर होणार आहे.
बुधवारी (दि. १९) सकाळी १० वाजून १० मिनिटांनी जन्मकाळ सोहळा, तर सायंकाळी ४ वाजता, पारंपरिक भव्य मिरवणूक होणार आहे. यावेळी खा. शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आ. सतेज पाटील, आ. चंद्रकांत पाटील व कालिचरण महाराज आदी उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी (दि. २०) रात्री ८ वाजता मराठी गीतांचा कार्यक्रम आणि आतषबाजीने उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Scroll to Top