पन्हाळ्यावर ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा उत्कृष्ट नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने शिवजयंती निमित्त बुधवारी (दि.१९) पन्हाळ्यावर ‘जय शिवाजी, जय भारत’ या पदयात्रेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ही ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा आयोजित केली आहे. याचा मुख्य कार्यक्रम पुण्यातील शनिवार वाडा येथे होणार असून सकाळी साडे सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने याचे उ‌द्घाटन होणार आहे. यानंतर सकाळी ८ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल. सकाळी १० वाजता तिचा समारोप होणार आहे. सुमारे सहा ते आठ किमी ही पदयात्रा शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणी जाणार आहे.
पन्हाळा येथे होणाऱ्या या पदयात्रेत तळसंदे कॉलेज, वारणा, संजीवनी स्कूल, पन्हाळा पब्लिक स्कूलमधील तसेच आजूबाजूच्या सर्वच शाळांतील विद्यार्थी, खेळाडू तसेच ग्रामस्थही सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांसह सुमारे तीन हजार जणांचा या पदयात्रेत सहभाग राहणार आहे. दि.१७ वर दि.१८ रोजी योगा, स्वच्छता दिवस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Scroll to Top