परीक्षेच्या तणावातून नर्सिंगच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन

बुधवारपासून सुरू होत असलेल्या नर्सिंग परीक्षेच्या तणावातून अमृता संतोष आंबेकर (वय १९, रा. इंदिरानगर, शिरोळ) युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. मंगळवारी (दि.११) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबतची नोंद शिरोळ पोलिसांत झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अमृता ही जयसिंगपूर येथील एका बीएसस्सी नर्सिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. तिची बुधवारपासून परीक्षा सुरू होणार होती. या परीक्षेच्या तणावातून मंगळवारी (दि.११) दुपारी अडीच्या सुमारास राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. तिचे वडील संतोष जनार्दन आंबेकर यांनी तिला त्वरित खाली उतरवून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संतोष आंबेकर यांनी मुलीने परीक्षेच्या तणावातून जीवन संपविल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. सहायक फौजदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top