इचलकरंजी : प्रतिनिधी

वाद मिटला असताना पुन्हा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात चक्क शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात फ्रीस्टाईल हाणामारीचा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या घटनेने पोलिसांची मात्र तारांबळ उडाली. दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारात हाणामारीप्रकरणी दोन्ही कुटुंबातील ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, शहरातील नेहरूनगर झोपडपट्टीतील दोन कुटुंबांमध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी काही कारणावरून वाद झाला होता; पण हा वाद मिटवण्यात आला होता. परंतु, मंगळवारी सकाळी एका मुलाला मारहाण झाली. याची माहिती कळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दोन्ही कुटुंबे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आली. त्याठिकाणी या दोन्ही कुटुंबातील वाद पुन्हा उफाळून आला आणि ठाण्याच्या आवारात फ्रीस्टाईल तुंबळ हाणामारी झाली. पोलीस ठाण्याच्या आवारातच भांडण सुरू झाल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.
दोन्ही कुटुंबातील महिलांनी एकमेकांना जोरदार हाणामारी केली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कुटुंबातील सदस्यांना बाजूला करून शांत राहण्यास सांगितले. फ्रीस्टाईल हाणामारीने पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी पोलीस ठाण्याच्या आवारात भांडण व हाणामारीप्रकरणी दोन्ही कुटुंबातील ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये सुशीला दयानंद दोडमन्नी (वय ५२), माधुरी जितेंद्र दोडमन्नी (वय ३२), जितेंद्र दयानंद दोडमन्नी (वय ३६), दयानंद लक्ष्मण दोडमन्नी (वय ६५, सर्व रा. नेहरुनगर), शबाना मगदूम टकळगी (वय २५), जहीर शमशुद्दीन पठाण (वय ४२), रमेजा सलीम शेख (वय ५०, तिघे रा. नेहरूनगर) व बुसेरा जहीर पठाण (वय ३५, रा. गोंधळी गल्ली) यांचा समावेश आहे.
