इचलकरंजी/प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे 1 ते 9 जानेवारी 2025 या कालावधीत पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामहोत्सवासाठी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महोत्सवाचे महत्त्व स्पष्ट करत ऐतिहासिक व धार्मिक महोत्सवास उपस्थित राहण्यासाठीचे आमंत्रण दिले.
आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी शुक्रवारी मुंबई येथील सागर निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत पंचकल्याणक महोत्सव कमिटीचे कार्याध्यक्ष सागर शंभूशेटे होते. आमदार आवाडे यांनी, नांदणी येथे 1 ते 9 जानेवारी या कालावधीत पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव नांदणीच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून यात जैन धर्माच्या पवित्र परंपरेचे दर्शन घडेल. या कार्यक्रमासाठी शंभरपेक्षा अधिक साधु-संतांचे एकाचवेळी दर्शन घडणार आहे. तर महोत्सव कालावधीत दररोज सुमारे एक ते दीड लाख श्रावक-श्राविका महोत्सवात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. अशा या ऐतिहासिक कार्यक्रमास आपली उपस्थिती लाभल्यास कार्यक्रमाला अधिक गौरव व प्रेरणा मिळेल, असे आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निमंत्रणाचा स्विकार करत महोत्सव कालावधीत निश्चितपणे येण्यास सकारत्मकता दर्शविली. यावेळी राजकुमार सावंत्रे, स्वप्निल देसाई, दर्शन टारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.