दहावी बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची गय नाही : राजेश क्षीरसागर

यावर्षी होणा-या इयत्ता दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त घेण्याबरोबरच निकालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांसह परीक्षा संचलनातील सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी जिल्हास्तरावरून सर्व विभागांची भरारी पथके नेमून अचानक भेटी देण्याबाबत आदेश काढणार असल्याचे बैठकीत सांगितले.
कोल्हापूर विभागीय मंडळाच्यावतीने कोल्हापूर जिल्हयातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची दोन टप्प्यात बैठक येथील विवेकानंद महाविद्यालयात गुरुवारी आयोजित केली होती. यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले की, प्राचार्य व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी चांगली करून घ्यावी, शाळा स्तरावर उजळणी घेऊन पुरेसा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घ्यावा. केंद्रावर होणारे गैरप्रकार बंद करा. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा नियमावलीतील तरतुदींसह दिला. विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी. एम. किल्लेदार, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, योजना शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे, बोर्डाचे अधिक्षक सुधीर हावळ, एस.वाय. दूधगावकर, एम. जी. दिवेकर, एच. के. शिंदे, आम्रपाल बनसोडे, प्रणाली जमदग्नी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Scroll to Top