बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही गंभीर घटना आहे. या हत्येची सरकारने गंभीर दखल घेतली असून, आरोपी कुठल्या पक्षाचा, धर्माचा किंवा जातीचा आहे, कुठली भाषा बोलतो, कुणाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा विचार न करता दोर्षीवर कारवाई करणार.
कोणालाही सोडणार नाही, असा इशारा देतानाच सीआयडीमार्फत या हत्येचा तपास सुरू आहे, तरीही यासंदर्भात अधिक तपास करण्यासाठी एसआयटी नेमणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधान परिषदेत बीडमधील केज तालुक्यातील
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद उमटले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले, सरपंच संतोष देशमुख यांना हृदयालाही पीळ बसेल, अशा पद्धतीने मारहाण झाली आहे. यामध्ये सहा आरोपी आहेत. तीन आरोपींना पकडण्यात आले असून, तीनजण फरार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.