भारतीय जनता परटीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरलं आहे. भाजपा विधिमंडळाच्या बैठकीनंतर महायुतीचे नेते आज दुपारी राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
सकाळी ११ वाजता विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक होती. या बैठकीत भाजपाचे १३२ आमदार त्याशिवाय भाजपाला पाठिंबा दिलेले ५ इतर आमदारही उपस्थित होते. बैठकीपूर्वी भाजपा नेते, आमदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या बैठकीसाठी विधानभवन फुलांनी सजवलं होते. त्याशिवाय भाजपा आमदारांनी भगवे फेटे घातले होते. या बैठकीला सुरुवात होण्याआधी नेत्यांनी पक्षाचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत केले. बैठकीआधी भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यात प्रस्ताव कोण मांडणार, सूचक, अनुमोदक कोण असणार हे ठरवण्यात आलं. तोपर्यंत भाजपा आमदार सेंट्रल हॉलमध्ये जमले होते. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सगळे नेते सेंट्रल हॉलमध्ये पोहचले.
या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला पंकजा मुंडे, प्रविण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उइके, आशिष शेलार, योगेश सागर, गोपीचंद पडळकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर या प्रस्तावाला भाजपाच्या सर्व आमदारांनी एकमताने मंजुरी दिली.
अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र अखेर भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुंबई, नागपूर येथील भाजपा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, ढोलताशे वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.