आमदार डॉ. राहुल आवाडे करणार 56811 वृक्षांची लागवड

इचलकरंजी विधानसभा व परिसरात राबविणार अनोखा उपक्रम

इचलकरंजी/प्रतिनिधी
निवडणूक जिंकली….जल्लोष अन् आनंदोत्सव साजरा केला…पण ज्यांच्या बळावर आपण हे यश प्राप्त केले त्या जनतेच्या प्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी व जनहित सार्थकी लावण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणूकीमध्ये मिळालेल्या 56 हजार 811 मताधिक्या इतकी संपूर्ण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ व परिसरात वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा हा संकल्प पर्यावरणाला बळ देणारा असाच आहे.
निवडणूका झाल्या की गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजीसह जल्लोष साजरा केला जातो. त्यानंतर सत्कार सोहळा, जंगी मिरवणूक यामध्ये अनेकजण गुरफटून जातात. निवडणूक झाली की आपलं काम झालं या निकषावर जनतेकडे दुर्लक्ष होते. परंतु या सर्व गोष्टींना दूर ठेवत आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी संपूर्ण मतदारसंघासह परिसरात वृक्ष लागवड करण्याचा अनोखा संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
आमदार राहुल आवाडे यांच्या या अनोख्या संकल्पनेची सोशल मीडीयावरही जोरदार चर्चा होत असून कौतुकांचा वर्षाव सुरु झाला आहे. सहकार महर्षि, निष्कलंक राजकारणी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी सदैव जोपासणारे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातु आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांचे सुपूत्र असलेले आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आपल्या आजोबांच्या पर्यावरणाचे जतन या संकल्पनेला बळ देण्याचा छोटासा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात केलेली वृक्षलागवड राज्यातच नव्हे तर देशभरात नांवलौकिकास पात्र ठरली आहे. त्याच धर्तीवर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत आपल्याला मिळालेल्या मताधिक्याइतकी वृक्षलागवड संपूर्ण मतदारसंघासह परिसरात करण्याचा संकल्प आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी केला आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉ. राहुल आवाडे यांना 56 हजार 811 इतके मताधिक्य मिळाले आहे. पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आपल्याला मिळालेल्या मताधिक्याइतकी झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. त्यांचा हा संकल्प वस्त्रनगरी, औद्योगिकनगरी असलेल्या इचलकरंजीला वायु प्रदुषणापासून मुक्त होण्यासाठी पर्यावरणदृष्ट्या महत्वाचा व समृध्द करणारा असा आहे.

राजकारण असो किंवा निवडणुक या क्षणिक गोष्टी आहेत. म्हणून लोकप्रतिनिधीने ज्यांच्या बळावर आपण पुढे जात असतो त्या जनहिताला प्राधान्य देण्याची गरज असते. आजच्या काळात विविध कारणांनी पर्यावरणाची र्‍हास होत चालली असताना निसर्गाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी वृक्ष लागवडीशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे 56 हजार 811 वृक्ष लागवडीच्या संकल्पनेतून पर्यावरणाला बळ देण्याचा हा माझा प्रयत्न आहे. त्या संदर्भातील नियोजन सुरु असून नागरिकांनीही या संकल्पनेत सहभाग नोंदवावा. – डॉ. राहुल आवाडे, आमदार इचलकरंजी विधानसभा

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Scroll to Top