“जागतिक बाल दिन”
बाल दिन हा एक खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारतात, भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (१४ नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटना जगातील मानवकल्याणासाठी विविध कृतिकार्यक्रम, विशेष दिन राबवून मानवामध्ये जाणीवजागृती करत असते. उदा., जागतिक महिला दिन, एड्स सप्ताह, मानवी हक्क दिन, बालदिन इत्यादी. यांमध्ये एक दिवसापासून ते एक आठवडा, पंधरवडा, पूर्ण वर्ष, दशक इतक्या कालावधीत नियोजित कार्यक्रम साजरे करून समाजपरिवर्तनाचा प्रयत्न केला जातो. या कालावधीत निश्चित कृतिकार्यक्रम करून जाणीवजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
२० नोव्हेंबर १९५९ रोजी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेने बालहक्कांची सनद स्वीकारली. त्यामुळे ‘२० नोव्हेंबर’ हा दिवस जागतिक बालदिन म्हणून जगात साजरा केला जातो. २० नोव्हेंबर १९८१ रोजी बालकांच्या हक्कमसुद्यावर सदस्यदेशांनी सह्या केल्या. या सनदेवर आतापर्यंत १९१ राष्ट्रांनी सह्या केल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांचा बालकनिधी (United Nations International Children’s Emergency Fund – UNICEF) ही संस्था जागतिक स्तरावर बालकांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणी करत असते. बालदिन जागतिक स्तरावर विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.
विविध कार्यक्रमांचे आयोजनलहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या. त्यामुळे ‘बाल दिन’च्या निमित्ताने त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जावं असं ठरविण्यात आलं. आजही देशभरातील अनेक शाळांमध्ये या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
वरील माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही याच्याशी सहमत आहोतच असे नाही .