“भाऊबीज”
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.
भाऊबीज म्हणजे बहिण भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव असतो. भावाची मृत्यूपासून सुटका व्हावी आणि दीर्घायुषी व्हावा यामागे हा खरा उद्देश असतो .हा सण भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारा दिवस आहे. आपल्या मनातील द्वेष निघून सर्वत्र बंधू भावनेची कल्पना जागृत होते. म्हणून भाऊबीज साजरी करतात असेही म्हणतात.
कुष्ठरुग्णांबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत म्हणून त्यांच्यासोबत भाऊबीज केली जाते. देवदासींना भगिनींना भेटवस्तू दिल्या जातात. सणवारात सामाजिक उपक्रम करून त्याचा आनंद द्विगुणीत करण्याचा हा प्रयत्न असतो. सध्या कालानुरूप आणखी एक बदल पहायला मिळतो तो म्हणजे एक बहिणीच्या घरी किंवा एका भावाच्या घरी सगळेजण एकत्र जमतात आणि भाऊबीज साजरी करतात. तुम्हीही भाऊबीज उत्साहात आणि आनंदात साजरी करा.
संग्रहित माहिती,
वरील माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही याच्याशी सहमत आहोतच असे नाही .