यज्ञ फौंडेशनकडून ७५ क्षयरुग्ण दत्तक

कोल्हापूर / प्रतिनिधी

येथील यज्ञ फौंडेशनच्यावतीने ७५ क्षयरोग बाधित मुले दत्तक घेण्यात आली असून त्यांना पुढील ६ महिन्यांसाठी या मुलांच्या पोषण आहाराची जबाबदारी यज्ञ फौंडेशन या संस्थेने उचलली आहे.
पंतप्रधान टी. बी. मुक्त भारत या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या क्षयरुग्णांना पोषण आहार देण्याच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत येथील यज्ञ फौंडेशन यांचे वतीने ७५ क्षयरोग बाधित मुले दत्तक घेण्यात आली. त्यांना पोषण आहार देण्याचा कार्यक्रम श्री महालक्ष्मी धर्मशाळा हॉल येथे झाला. हा कार्यक्रम भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भाजपचे प्रदेश सदस्य राहुल चिकोडे, श्री महालक्ष्मी अन्नछत्रचे
संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी, भाजपाचे उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, महापालिका उपायुक्त पंडित पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, क्षयरोग अधिकारी डॉ. अमरसिंह पोवार आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भाजपाचे प्रदेश दिवसेंदिवस वेगाने फैलावणाऱ्या क्षयरोगाचा अटकाव करण्यासाठी हे रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून पुढील ६ महिन्यांसाठी या मुलांच्या पोषण आहाराची यज्ञ फौडेशन या संस्थेने घेतलेली जबाबदारी खरोखर स्तुत्य आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास यज्ञ फौंडेशनचे संचालक लक्ष्मीदास जोशी, आदित्य मेवेकरी, अंकित भोसले, आशिष पाटील, रजत जोशी, पूजा मेवेकरी, सौमित्र जोशी व अतिश जाधव उपस्थित होते. या उपक्र मासाठी कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण सोसायटी यांचे सहकार्य लाभले.

Scroll to Top